मुंबई : कृषिविषयक धोरणांची प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यासाठी विभागाने झोकून काम करावे. प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
कृषिमंत्रीपदाचा कार्यभार श्री.भुसे यांनी आज सकाळी मंत्रालयात स्वीकारला. यावेळी विभागाचा आढावा त्यांनी घेतला. कृषी आयुक्त, विभागप्रमुख, संचालक आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृषीमंत्र्यांनी त्यांचे ‘व्हिजन’ स्पष्ट केले.
शेतकरी केंद्रबिंदू मानून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. आपण सारे शेतकरीपुत्र आहोत. याची जाणीव ठेवत शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.
मंत्रालयात कृषिविषयक ध्येय धोरणे, योजना आखल्या जातात. त्या प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्याच्या बांधावर नेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कृषी विभागातील योजनांचे संलग्नीकरण करुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल या दृष्टीने योजना राबविल्या जातील, असेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले. कृषी विभागातर्फे प्रगतीशील शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन राज्यभरातील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले जाईल. त्यातून अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.