नवी दिल्ली : चेन्नईमधील पर्यावरणवादी डॉ. अब्दुल घनी यांनी एक वृक्षसंवर्धनासाठी एक आगळावेगळा प्रयोग सुरु केला आहे. ‘ग्रीन मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनी यांनी चक्क झाडांना प्रथमोपचार देण्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. खोड किंवा फांद्या तुटलेल्या तसेच कोणीही उपटून टाकलेल्या झाडांना पुन्हा उभं करण्याच्या दृष्टीने घनी यांनी ही मोहिम सुरु केली आहे.
जगभरातील हरित पट्टा कमी होत आहे. अनेक ठिकाणी बेसूमार वृक्षतोड होत असून त्याचा पर्यावरणावर परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी कारखाने, वसाहतींसाठी जंगलांची कत्तल केली जात आहे. या सर्वांमध्ये अनेक झाडे मारली जात असून अशा झाडांना जगण्याची दुसरी संधी देत ‘जखमी’ झालेल्या झाडांची काळजी घेत त्यांना प्रथमोचार पोहचवून त्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. २०२० पर्यंत संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात ही मोहिम पोहचवण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे घनी यांनी एनएनआयशी बोलताना सांगितले.
घनी यांनी एनएनआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘या रुग्णवाहिकेने ५ जूनपासून आपला प्रवास सुरु केला आहे. तामिळनाडूमधून निघालेली ही रुग्णवाहिका वृक्षसंवर्धनासंदर्भात जागृती करत करत पुढील दोन महिन्यांमध्ये दिल्लीमध्ये पोहचणार आहे. या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणच्या शाळा तसेच कॉलेजसमध्ये वृक्षसंवर्धन आणि जंगलांचे महत्व मुलांना सांगणार आहे.’