नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.
प्रधानमंत्री मोदी यांनी काल नीती आयोगाच्या बैठकीत ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, खासगी उद्योगपती, उत्पादन, प्रवास आणि पर्य़टन, परिधान आणि रोजच्या वापरातल्या वस्तुंचे निर्माते, कृषी, विज्ञान आणि औद्योगिक आणि वित्तीय क्षेत्रातल्या तज्ञांशी संवाद साधला. अर्थसंकल्पा अगोदरच्या चर्चेचा भाग म्हणून ही बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी अमेरिकी डॉलरइतकी करण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व भागधारकांनी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. पाच लाख कोटी अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना ही अचानक घडलेली घटना नाही, तर देशाच्या सामर्थ्याचा सखोल अभ्यासानंतर ही कल्पना केली आहे, असं मोदी म्हणाले. पर्यटन, नगरविकास, पाय़ाभूत विकास आणि कृषी आधारित उद्योग यांच्यात अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाण्याची आणि रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता आहे, असंही ते म्हणाले.
दोन तास चाललेल्या या बैठकीत प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती तसंच विविध क्षेत्रातले तज्ञ यांच्यात विचारांची देवाण घेवाण झाली. गृहमंत्री अमित शहा, परिवहनमंत्री नितीन गडकरी, वाणिज्यमंत्री पियूष गोयल, निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, वरीष्ठ कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि अन्य वरीष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.