महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून देश-विदेशात पोहोचणार

मुंबई : राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासह भागीदारी केली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ले, विस्मरण झालेल्या शूरवीरांची गौरवगाथा आणि पर्यटनाला चालना दिली जाईल. चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे.

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट टी- सिरीज आणि अजय देवगण फिल्म्स बॅनरखालील ओम राऊत दिग्दर्शित ऐतिहासिक कालखंडातील नाट्यरूपांतर चित्रपट आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला.

हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्ती सहाय्यक आणि विश्वासू तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित  आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, जगपती बाबू आदी मान्यवर कलाकारांचा समावेश आहे.

या भागीदारीचा एक भाग म्हणून पर्यटन संचालनालयाने आपल्या समृद्ध वारशाचा गौरव साजरा करण्यासाठी जनतेला राज्यातील दुर्लक्षित सौंदर्याकडे आकर्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. यासाठी पर्यटन संचालनालयाने चित्रपटाचे मुख्य अभिनेते अजय देवगण यांचे सहकार्य घेतले आहे. या माध्यमातून प्रेक्षकांना तान्हाजींसारख्या योद्धांच्या अद्भुत शौर्याची आठवण करून देणाऱ्या किल्यांना भेट देण्याचे अश्वासित केले आहे. अशा योद्ध्यांच्या आठवणी अजूनही महाराष्ट्राच्या मौल्यवान किल्यांमध्ये आहेत. यासाठी खालीलप्रमाणे एक को-ब्रँडेड टीव्हीसी तयार केली आहे जो टीव्ही, सिनेमा अ‍ॅडव्हर्टायझिंग आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना पर्यटन संचालक दिलीप गावडे म्हणाले की, आमची वारसास्थळे आजही प्रेरणादायी आहेत. ही स्थळे आपल्या विशाल इतिहासाच्या घटना जतन करतात. आपल्यातील प्रत्येकाने आपल्या पूर्वजांच्या शौर्याच्या कृत्याबद्दल जागरूक असणे आणि त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. आपल्या ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही सिंहगड, रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड इत्यादी अनेक किल्ले आहेत जे आपल्याला आपल्या गौरवशाली भूतकाळाची झलक पाहण्यास मदत करतात. लोकांनी या किल्ल्यांना भेट देण्यासाठी आणि राज्यात असलेल्या अशा ऐतिहासिक स्थळांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही चित्रपटासह को-ब्रँडेड मोहीम तयार केली आहे. अजय देवगण हे लोकप्रिय अभिनेते आणि आदरणीय व्यक्ती आहेत. त्यामुळे आमची कल्पना लोकांपर्यंत पोहचविण्याची ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या माध्यमातून या मोहीमेचा प्रारंभ केला आहे, असे ते म्हणाले.

या भागीदारी विषयी भाष्य करताना प्रॉडक्शन हाऊसचे प्रवक्ते म्हणाले की, लोकांच्या जीवनावर सिनेमाचा होणारा परिणाम लक्षात घेता हे संघटन आपल्या राज्यातील दुर्लक्षीत वारसा रत्नांना व्यापकपणे लोकप्रिय करेल. आमचे आगामी संघटन देखील याला परिपूर्ण सहकार्य करेल. भविष्यात पडद्यामागे असलेल्या योद्ध्यांची शौर्यगाथा दाखविण्याचे उद्दीष्ट आहे. अशा संघटनाच्या माध्यमातून आम्ही इतिहासाच्या त्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करीत आहोत.

महाराष्ट्रातील किल्ल्यांसंदर्भात फोटो आणि व्हिडिओ स्पर्धा 
या अनोख्या उपक्रमाचा विस्तार म्हणून पर्यटन संचालनालयाने महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ स्पर्धादेखील सुरू केली आहे. हौशी तसेच व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली आहे. यासंबंधी अधिक माहिती महाराष्ट्र टूरिझमच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे.