नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनचं प्रवासी विमान चुकून पाडल्याच्या घटनेची संपूर्ण जबाबदारी इराणचे क्रांतिकारी रक्षक जनरल अमिर अली हाजीजदेह यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सैन्याच्या तुकडीनं स्वीकारली आहे. स्थानिक दूरचित्रवाहिनीवरून केलेल्या भाषणात त्यांनी ही कबुली दिली.
जेव्हा 176 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान चुकीनं पाडल्याची बातमी समजली तेव्हा आपणच मेलो असतो, तर बरं झालं असतं, अशा शब्दात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. इराकच्या अमेरिकी तळांवर इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतरच्या तणावपूर्ण परिस्थितीत या प्रवासी विमानाला शत्रुचं विमान समजून सैन्यानं हा हल्ला केला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. दरम्यान, युक्रेनच्या प्रवास विमानावर हल्ला करून ते पाडण्याच्या घटनेतल्या मानवी चुकीबद्दल इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांनी तीव्र दुःख व्यक्त करून माफी मागितली आहे.