नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो-इंडिया युवा क्रीडास्पर्धांच्या चौथ्या दिवशी आज केरळच्या प्रिसिलिया डॅनिलयनं २१ वर्षाखालच्या मुलींच्या गटात ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं तर मुलांच्या गटात उत्तराखंडच्या अनुपकुमार महिमनं सुवर्णपदक पटकावलं.
१७ वर्षाखालच्या मुलींच्या गटात 800 मीटर्सच्या शर्यतीत केरळच्या स्टेफी सारानं तर तामिळनाडूच्या प्रदीप सेंथिलनं ८०० मीटर अडथळयांच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. आज झालेल्या कबड्डीच्या मुलामुलींच्या सामन्यात हरयाणानं चारही सुवर्णपदकं मिळवली.
पदकतालिकेत अद्यापही १५ सुवर्ण १६ रौप्य आणि २९ कांस्य पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे तर १३ सुवर्ण, १६ रौप्य पदकांसह हरयाणा दुस-या आणि दिल्लीचा संघ तिस-या क्रमाकांवर आहे.