मुंबई : हंगेरी देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पिटर सिझार्तो यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे शिष्टमंडळासह भेट घेतली. यावेळी हंगेरीचे भारतातील राजदूत गायला पॅथो, मुंबईतील हंगेरीचे वाणिज्यदूत फेरेक जारी यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील प्रगतीशील राज्य असून मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतील अनेक पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हीटी, प्रत्येक शहरामध्ये विद्युतीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. शिक्षण, संस्कृती, पर्यटन, तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. राज्यात कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने चार आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. राज्यामध्ये अजिंठा, वेरुळ, महाबळेश्वर, अशी अनेक पर्यटनस्थळे असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली.

श्री. सिझार्तो म्हणाले, युरोपियन युनियनमधील देशांपैकी हंगेरी हा देश आर्थिकदृष्ट्या 28व्या क्रमांकावर होता. परंतु गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे आज हंगेरी सर्वात जलद गतीने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आला आहे. या प्रगतीमध्ये चीन, कोरिया, जपान, यासह भारतीय गुंतवणूकदारांचेही मोठे योगदान आहे. भारतातील टीसीएस, टेक महिंद्रा, आदित्य बिर्ला या उद्योगांशिवाय बॅालिवूडदेखील हंगेरीमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे.

हंगेरीच्या लोकांमध्ये भारताबद्दल उत्सुकता असून बुडापेस्ट-मुंबई थेट विमानसेवा सुरू झाल्यास अनेक हंगेरीयन लोक भारतभेटीवर येतील. तसेच भारत व हंगेरी देशातील आयात-निर्यातीला प्रोत्साहन मिळेल बुडापेस्ट-मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी संबंधित केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करू, असे श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.