पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रसारभारतीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
‘निशान इजुद्दीन’ असे मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे नाव आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
श्रीलंकेत गेल्या महिन्यात झालेल्या भीषण दहशतवादी साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर भारत श्रीलंकेसोबत असल्याचे जाहीर करण्यासाठी मोदी हा दौरा करणार आहेत. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी गेल्या आठवड्यात मोदींच्या शपथविधी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ‘नेबरहूड फर्स्ट’ हे दर्शवण्याचाही मोदींचा प्रयत्न असणार आहे.
मालदीव भारताचा एक चांगला मित्र असून या दोशासोबत आपली संस्कृती आणि इतिहास खोलवर जोडला गेला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात मालदीवसोबत भारताचे द्विपक्षीय संबंध खूपच मजबूत झाले आहेत. या भेटीमुळे हे नाते अधिकच घट्ट होईल असे मोदींनी या दौऱ्यावर भाष्य करताना म्हटले आहे.