मुंबई : यंदा महाराष्ट्राला मेडिकलच्या 1740 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्राला एमबीबीएसच्या अतिरिक्त जागा मिळणार असल्याची माहिती तात्याराव लहाने यांनी बोलताना दिली आहे.
या शैक्षणिक वर्षात मेडिकल प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे या वाढलेल्या जागांचा फायदा मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राजधानी दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेतली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचं नुकसान भरुन काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. डॉ. हर्ष वर्धन यांना राज्य सरकारच्या वतीने एक विनंतीपत्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी सादर केलं. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शाखेच्या 813 जागा, तर पदवी शाखांमध्ये 1740 जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या मागणीवर सकारात्मक आणि वेगाने कार्यवाही करण्याचं आश्वासन डॉ. हर्ष वर्धन यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं.