पिंपरी : महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामाचे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. बोपखेल ते खडकी या पुलाची लांबी 1537 मीटर असून रुंदी 7.5 मीटर आहे. पुलास सुमारे 53 कोटी 53 लाख रुपये खर्च अपेक्षित असून जुलै 2021 अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. दरम्यान, पुलासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांनी केली.

आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, नगरसेवक विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नगरसदस्या हिराबाई घुले, निर्मला गायकवाड, माजी दत्तात्रय गायकवाड, बाजीराव लांडे, उर्मिला काळभोर सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे, दीपक पाटील, संजय पाटील, रविंद्र सुर्यवंशी, बोपखेल येंथील सामाजिक कार्यकर्ते नारायण घुले, कमलेश घुले, मंगला घुले, संतोष घुले, विष्णू गायकवाड, गुलाब घुले, राजेंद्र देवकर, नारायण काळे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

‘संघर्षमय जीवन जगणारे बोपखेलवासीय आहेत. सर्वाच्या सहकार्यामुळे बोपखेल येथील पुलाचे स्वप्न सत्यात अवतरले आहे’, असे महापौर राहूल जाधव म्हणाले. आमदार गौतम चाबुकस्वार म्हणाले, ‘पुलाचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हा संपूर्ण बोपखेलकरांच्या संघर्षाचा विजय आहे. गावकऱ्यांनी राज्य शासनावर योग्य तो दबाव टाकल्यामुळे कामास गती मिळाली. तत्कालीन जिल्हाधिकारी तसेच आमदार, खासदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यामुळे या यशात त्यांचे योगदान आहे’.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, ‘बोपखेलकरांचा पुलाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न होता. चार वर्षांपासून बोपखेलवासियांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. आता त्यांचा प्रश्न सुटणार आहे. येत्या दीड वर्षात बोपखेल ते खडकी या पुलाचे काम पूर्ण होऊन नागरिकांसाठी पूल खुला होईल. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’.

पुलासाठी पाठपुरावा करणारे बोपखेलचे नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ‘बोपखेलवासियांचा पुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. बोपखेलवासियांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पुलाचा प्रश्न सोडविण्यात यश आल्याचा आनंद आहे. या पुलाचे श्रेय सर्व बोपखेलकरांचे आहे. पुलासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. 24 महिन्यात पुलाचे काम पूर्ण होणार आहे. आता वेगात पुलाचे काम पूर्ण करुन घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. शक्य तेवढ्या लवकर बोपखलवासियांच्या सेवेत पूल आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत’.

नगरसेवक लक्ष्मण उंडे म्हणाले, ‘बारा किलोमीटरचा वळसा घालून नागरिकांना जावे लागत होते. तो त्रास आता होणार नाही. या कामासाठी सर्वांचे सहकार्य लाभले’. नगरसेविका निर्मला गायकवाड म्हणाल्या, ‘आज बोपखेलकरांचा आनंद सोहळा आहे. गावकऱ्यांच्या लढयाला यश आले आहे. विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रश्न सुटला आहे’. नगरसेविका हिराबाई घुले म्हणाल्या, ‘या पूलामुळे गोरगरीबांचा व शाळेचा मोठा प्रश्न सुटणार आहे. येथील मुलांवर व महिलांवर फौजदारी गुन्हे आहेत ते सर्व गुन्हे मागे घ्यावेत. याबाबत आमदार व खासदार यांनी पाठपुरावा करावा’.

बोपखेल परिसरातील नागरिकांना पुण्याकडे ये – जा करणेसाठी भोसरी किंवा विश्रांतवाडी, खडकी मार्गावरुन सुमारे 10 ते 15 किलो मीटर अंतराचा वळसा घालावा लागत आहे. परंतू, या पुलामुळे 2.9 किलो मीटर अंतरावर खडकी कॅन्टोमेंट भागातून पिंपरी-चिंचवड व पुणे शहराकडे जाणे सुलभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व इंधनखर्च वाचणार असून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल.