बंगळुरु : ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं (10 जून) निधन झालं. दीर्घ आजाराने बंगळुरुत वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेले अनेक दिवस ते आजारी होते.

गिरीश कर्नाड यांच्या रुपाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. तुघलक, नागमंडल, हयवदय या नाट्यकृतींचं दिग्दर्शनही गिरीश कर्नाड यांनी केलं होतं. गिरीश कर्नाड यांचा पद्म आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मान झाला आहे.

81 वर्षीय गिरीश कर्नाड हे कन्नड भाषिक लेखक, अभिनेते, दिग्दर्शक होते. दाक्षिणात्य चित्रपटांसोबत बॉलिवूडमध्येही त्यांनी ठसा उमटवला होता. कर्नाड यांना 1974 मध्ये पद्मश्री, 1992 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. 1994 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. 1998 मध्ये कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. ययाति, तुघलक, हयवदन यासारखी त्यांनी लिहिलेली कन्नड नाटकं गाजली.

गिरीश कर्नाड यांना दहावेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला होता. टायगर जिंदा है, चॉक अँड डस्टर, शिवाय यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली आहे. ‘उंबरठा’ या स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका असलेल्या मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलं होतं.