नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आजही, राज्यसभेच्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी लावून धरली. सभागृहात झालेल्या गदरोळामुळे राज्यसभेचं कामकाज तीनवेळा तर, लोकसभेचं कामकाज एकदा तहकूब करावं लागलं. राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला १२ आणि नंतर दुपारी २ पर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरू झाल्यावर उपाध्यक्ष हरिवंश यांनी प्रश्नोत्तराचा तास होऊ देण्याचं आवाहन केलं. मात्र काँग्रेस, तृणमूल आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांचा गोंधळ सुरू होता. राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपआपसात चर्चा करुन यावर तोडगा काढण्याचं आवाहन केलं असल्याचं हरिवंश म्हणाले. दोन वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर धरण सुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. ते मंजूर झाल्यानंतर कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजात आज सुरुवातीला अर्धातास प्रश्नोत्तर घेण्यात आली. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, गेल्या वर्षभरात ६ हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण झालं आहे. कंटेनर निर्मितीसाठी कुठलीही कंपनी स्थापन करण्याचा रेल्वेचा मानस नसल्याचंही ते म्हणाले. किमान आधारभूत किंमत आणि अन्नधान्य खरेदीसाठी एकसमान धोरणाच्या मागणीसाठी तेलंगणा राष्ट्रसमितीच्या सदस्यांनी सभापतींसमोरच्या जागेत येऊन गोंधळ घातला. त्यानंतर कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. त्यापूर्वीच खासदारांचं निलंबन मागे घ्यावं या मागणीसाठी काँग्रेस आणि द्रमुकनं सभात्याग केला होता.