नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त राष्टपती रामनाथ कोविंद यांनी गोव्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून सर्व भारतीयांना त्याचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. गोव्यानं विकासाच्या निकषांवरही उत्तम प्रगती साधल्याचे कौतुक करत राष्ट्रपतींनी पुढील वाटचालीसाठी गोवा राज्याला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनीही गोव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा आपलं नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती आणि आदरातिथ्य यासाठी प्रसिद्ध असून देशाच्या विकासात या राज्याचं मोलाचं योगदान आहे. येणाऱ्या काळात गोवा विकासाची नवी उंची गाठेल अशी आशा उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.