नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारला देशात आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजप केंद्र आणि राज्यांमधील भाजप सरकारमधील सर्व मंत्री,खासदार, आमदार मोदी सरकारच्या जनजागरण मोहिमेत भाग घेतील, असं आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग म्हणाले. आज ते नवी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं देशभरात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण याला प्राधान्य दिलं असल्यानं या थीमवर जनजागरण आयोजित केलं जाईल, असंही ते म्हणाले. या मोहिमेचा एक भाग म्हणून, बूथपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत ७५ तासांचा जनजागरण कार्यक्रम आयोजित केला जाईल, ज्यामध्ये सर्वस्तरातले लोकप्रतिनिधी भाग घेतील आणि गावांना भेट देतील. प्रत्येक दिवस हा शेतकरी, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचण्यासाठी समर्पित करण्यात आला आहे, असं सिंह यांनी यावेळी सांगितलं.