नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपानं काल १८ उमेदवारांची यादी जाहीर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून उमेदवारी देण्यात आली असून वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे. १८ उमेदवारांपैकी उत्तर प्रदेशमधून ६, महाराष्ट्रातून ३, कर्नाटक आणि बिहारमधून प्रत्येकी २ तर मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, झारखंड आणि हरियाणा या राज्यातून प्रत्येकी १ उमेदवार भाजपानं उभे केले आहेत. महाराष्ट्रातल्या अन्य दोन उमेदवारांमध्ये अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा समावेश आहे. काँग्रेसनंही राज्यसभा निवडणुकांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना तामिळनाडूमधून तर जयराम रमेश यांना कर्नाटकमधून उमेदवारी दिली आहे. रणदीप सिंह सुरजेवाला, मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी यांना राजस्थानमधून, राजीव शुक्ला यांना छत्तीसगडमधून तर अजय माकन यांना हरियाणामधून उमेदवारी देण्यात आली आहे.