पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष पदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अँड. माधवी नाईक यांनी आज जाहीर केले.

या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर उषा ढोरे, माजी मंत्री विनोद तावडे, खासदार अमर साबळे, मावळते शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, उमा खापरे, सदाशिव खाडे, सचिन पटवर्धन, अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी तसेच आजी- माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

लक्ष्मण जगताप यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लांडगे भाजपच्या चिन्हावर मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. आता त्यांची भाजपाच्या शहराध्यक्षपदी निवड झाली आहे.