नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रु-रियांग शरणार्थ्याना त्रिपूरामधे कायम स्वरुपी वास्तव्यास परवानगी देणा-या कराराचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. या करारांमुळे ब्रु शरणार्थ्याना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. या करारावर काल नवी दिल्लीत केंद्र सरकार, त्रिपुरा, मिझोराम आणि ब्रु शरणार्थ्याच्या प्रतिनिधीनं स्वाक्ष-या केल्यानं मागच्या 22 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न निकालात निघाला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, मिझोरामचे मुख्यमंत्री झोरमथांग यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्ष-या झाल्या. या करारानुसार 30 हजाराहून जास्त शरणार्थी त्रिपूरामधे स्थायिक होतील. ब्रु शरणार्थ्याच्या पुनर्वसनासाठी केंद्रसरकारनं 600 कोटी रुपये जाहीर केले असून ईशान्यकडील राज्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास सरकार बाध्य असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांना सांगितलं.