मुंबई : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार पडताळणी कार्यक्रम आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणाचा पुनरिक्षण कार्यक्रम 13 फेब्रुवारी 2020 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, याद्या प्रसिध्द केल्यानंतर त्यामध्ये पात्र मतदारांची नावे समाविष्ट नसल्यास अथवा प्रारुप मतदार यादीमधील नोंदीबाबत आक्षेप असल्यास, मतदारांना काही दुरुस्ती करावयाची असल्यास 28 फेब्रुवारी ते 27 मार्च या कालावधीत विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. मतदाराचे दावे व हरकती 27 मार्चपर्यंत स्वीकारण्यात येणार असून, ते 15 एप्रिल 2020 पूर्वी निकाली काढण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 5 मे रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
ज्यांची जन्मतारीख दि. १ जानेवारी २००2 वा त्यापूर्वीची आहे व जो सामान्य रहिवाशी आहे, अशा व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र ठरणार आहेत.
मतदारांच्या सोयीसाठी संकेतस्थळावरही ऑनलाइन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पूर्वीच्या मतदार यादीतील मयत झालेल्या, अन्यत्र स्थलांतरित झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अशा वगळलेल्या नावांची यादी जिल्हाधिकारी व जिल्हानिवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात ठेवली जाणार आहे. www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.