नवी दिल्ली : यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथ संचलनासाठी महाराष्ट्रातील 19 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.
येथील छावणी परिसरातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेट्साठी सराव शिबीर आयोजित करण्यात आले आहे. देशभरातील 17 एनसीसी संचालनालयाचे 2,155 कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत. मानाच्या समजण्यात येणाऱ्या राजपथावरील पथसंचलनात देशभरातील 144 एनसीसी कॅडेट्स सहभागी होणार आहेत, यात महाराष्ट्रातील 19 कॅडेट्सची निवड झाली आहे.
राज्यातील 116 एनसीसी कॅडेट्स 1 जानेवारीपासून या शिबिरात दाखल झाले आहेत. यात 77 मुले तर 39 मुली आहेत. त्यातील 16 कॅडेट्स हे माध्यमिक शाळांचे तर उर्वरित 100 कॅडेट्स हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. यातील 10 मुले आणि 9 मुली अशा एकूण 19 कॅडेट्सची प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनासाठी निवड झाली आहे. 28 जानेवारीला होणाऱ्या ‘प्रधानमंत्री रॅली’ मधे मानवंदना देण्यासाठी 54 एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री आदी गणमान्य व्यक्तींना मानवंदना देण्यासाठी राज्यातील 9 कॅडेट्सची निवड झाली आहे.
घोडेस्वारी व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राच्या कॅडेट्सी निवड – विंग कमांडर विक्रम त्यागरामन
राजपथावरील एनसीसीच्या घोडेस्वार पथकातील सहभागासाठी 5 आणि गणमान्य व्यक्तींच्या भेटीदरम्यान एनसीसीच्या वतीने सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राज्यातील 20 कॅडेट्सची निवड झाल्याची माहिती महाराष्ट्राच्या एनसीसी संघाचे प्रमुख विंग कमांडर विक्रम त्यागरामन यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला दिली. शिबीर आटोपून महाराष्ट्रात गेल्यानंतर राज्यपाल महोदय व मुख्यमंत्री महोदयांना एनसीसी कॅडेट्स भेटणार असून यातही हे 20 कॅडेट्स सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राला प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळणार : विंग कमांडर त्यागरामन
वर्षभरातील कामगिरी, देशभर आयोजित विविध महत्त्वाचे कँप व राजपथ पथसंचलनासाठीचे शिबीर या दरम्यान विविध स्पर्धांच्या आधारावर सर्वोत्तम एनसीसी संचालनालयासाठी दिला जाणारा ‘प्रधानमंत्री बॅनर’ हा बहुमानाचा निकाल 27 जानेवारी रोजी घोषित होणार आहे. गेल्या 28 वर्षांपैकी 17 वेळा ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान मिळवणारा महाराष्ट्र यावर्षीही हा बहुमान मिळवणार तसेच बेस्ट कॅडेट्सचा पुरस्कारही राज्याच्याच वाट्याला येणार असा विश्वास विंग कमांडर विक्रम त्यागरामन यांनी व्यक्त केला .
या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत येथे पार पडलेल्या ड्रिल स्पर्धा, राष्ट्रीय एकात्मता जागरुकता कार्यक्रम, शिप मॉडेलिंग स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, प्रधानमंत्री रॅली मानवंदना निवड स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील कॅडेट्स सहभागी झाले असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित एनसीसी कॅडेट्सच्या सराव शिबिरात 28 राज्य 9 केंद्रशासित प्रदेशातील 17 एनसीसी संचालनालयाचे 2,155 कॅडेट्स सहभागी झाले असून यात 732 मुलींचा समावेश आहे. तसेच, ‘एनसीसी युथ एक्सचेंज प्रोग्राम’ अंतर्गत 10 देशांतील 115 कॅडेट्सही सहभागी झाले आहेत.