मुंबई : सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या अन्न व औषधाच्या तपासणीसाठी असलेल्या प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश , अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
अन्न व औषध प्रशासनाच्या कामाचा त्यांनी आज मंत्रालयात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डॉ. शिंगणे म्हणाले, विभागाचे बळकटीकरण करीत असताना कार्यालय उभारण्यापेक्षा प्रयोगशाळांच्या आधुनिकीकरणावर भर द्यावा. रिक्त पदांसंदर्भात प्रस्ताव सादर करावा. राज्यात सध्या मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथे प्रयोगशाळा आहेत. पुण्याला एक प्रयोगशाळा प्रस्तावित आहे. बाकी ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. या सर्व प्रयोगशाळा अन्न व औषध प्रशासनाच्या अखत्यारित असाव्यात अशा प्रकारच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी या विषयाशी संबधित सर्व विभागांची संयुक्त बैठक बोलवावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
राज्यातील हॉटेल व्यावसायिक, मॉल व इतर ठिकाणी असलेले रेस्टॉरंट्स इथे स्वच्छता पाळली जाते आहे किंवा नाही तसेच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणताही संसर्गजन्य रोग नसावा यासाठी नियमित आरोग्य तपासणी होते आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल वेळोवेळी घेण्यासंबधीही त्यांनी सांगितले.
गुटखाबंदीमुळे तोंडाच्या कर्करोग्यांची संख्या कमी
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यानंतर तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे असा अहवाल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेने दिला आहे अशी माहिती डॉ. दराडे यांनी दिली. त्या म्हणाल्या, शाळेच्या परिसरातही गुटखाविक्री होत नसल्याने शाळकरी मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरित परिणामांमधे घट झाली आहे असाही अहवाल एका सर्वेक्षण संस्थेने दिला आहे.
ग्राहकांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनातर्फे नियमित कार्यवाही करण्यात येते. ‘झीरो कोलेस्ट्रॉल’, किंवा ‘ऑईल फ्री’ असा दावा करणाऱ्या मोठ्या कंपन्यांवर प्रशासनामार्फत अनेकवेळा कारवाई करून माल जप्त करण्यात आला आहे. अनेक नामांकित कंपन्यांनी या कारवाईनंतर आपला दावा मागे घेतला आहे. अशी माहिती डॉ.दराडे यांनी यावेळी दिली.