नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातून पदवी घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी राष्ट्राप्रती समर्पण भावनेने काम करीत ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एकोणिसाव्या दीक्षान्त समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमि़त देशमुख, पालकमंत्री  छगन भुजबळ, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, डॉ. तात्याराव  लहाने, आयुषचे संचालक कुलदीप राज कोहली, कुलसचिव डॉ. के.डी. चव्हाण, परीक्षा नियंत्रक  डॉ. अजित पाठक आदी उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले, आपल्याला समाजाने सर्व काही दिले आहे. समाजामुळे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात. त्यामुळे समाजसेवेला प्राधान्य देऊन सेवाभावनेने कार्य केल्यास वैद्यकीय क्षेत्रातील खरे समाधान विद्यार्थ्यांना मिळविता येईल.

भारतीय प्राचीन पंरपरेने आयुर्वेदासारखी मोठी देणगी आपल्याला दिली आहे. आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन ठेवून वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान मिळविण्याचा स्नातकांनी प्रयत्न करावा. वैद्यकीय क्षेत्र नोकरीसाठी नसून देशाचा आणि जगाचा गौरव वाढविण्यासाठी आहे, असेदेखील राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

श्री.भुजबळ म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील पदवी विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे जीवन बदलवून टाकणारी असते. या पदवीच्या माध्यमातून डॉक्टर म्हणून गोरगरीबांची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. त्यादृष्टीने पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी समाजसेवेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि आपल्या कार्याने विद्यापीठाचे नाव देशपातळीवर पोहोचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी.

श्री.देशमुख म्हणाले, आरोग्य विज्ञान विद्यापीठाची वाटचाल कौतुकास्पद आहे. भारतातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून याची ओळख आहे. हे विद्यापीठ देशात प्रथम क्रमांकाचे व्हावे यासाठी वेगवेगळ्या विद्या शाखा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. तळागाळातील जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टरांची अधिक संख्या आवश्यक असून त्यादृष्टीने विद्यापीठाचे प्रयत्न सुरु आहेत. नाशिकची ओळख राज्यातील ‘आरोग्यदायी शहर’ म्हणून व्हावी. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यशस्वी विद्यार्थ्यांनी राज्यातील जनतेचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रयत्न करावे आणि गुणात्मक आरोग्य सेवेवर भर द्यावा. पदवीचा उपयोग मानव सेवेसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कुलगुरु म्हैसेकर म्हणाले, विद्यापीठाद्वारे तयार करण्यात आलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमात नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने मान्यता प्रदान केली असून भारतातील सर्व आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र सुरु केले आहे.

आदिवासी व ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी विद्यापीठाने ‘सर्वांसाठी परिपूर्ण आरोग्य’ हा उपक्रम सुरु केला आहे. विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल 30 दिवसांच्या कालावधीत जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या समारंभात 62 गुणवंतांना सुवर्ण पदके आणि  14 विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान करण्यात आली.