नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्यानं तयार झालेल्या जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी मोठी गुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशानं, लवरकच सर्वंकष औद्योगिक धोरण जाहीर करण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी दिली.

जम्मू इथं स्थानिक उद्योजक आणि व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.  या धोरणाद्वारे संबंधित सर्व घटकांचं हित होणार असून उद्योगांच्या वाढीसाठी सर्वांना अनुकूल वातावरण निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. स्थानिक उद्योजकांना समर्थ आणि स्पर्धाक्षम करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही प्रकाश यांनी दिली. विविध राजकीय आणि आर्थिक अडथळ्यांमुळे या भागातल्या उद्योजकांना वेगवान विकासापासून वंचित राहावं लागलं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आता मात्र, उद्योजकांनी मांडलेल्या सर्व अडचणींचा विचार करून त्यावर मात केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. तर दुसऱ्या एका कार्यक्रमात, श्रीनगरमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल, सर्व व्यवहार महिलांमार्फतच चालवले जाणाऱ्या एका टपाल कार्यालयाचं उद्घाटन केलं.

श्रीनगरमध्ये लवकरच प्राप्तिकर विभागाच्या अपिलीय न्यायाधिकरणाचं विभागीय पीठ स्थापन करण्यात येईल, असं प्रसाद यांनी यावेळी सांगितलं. तसंच जम्मू काश्मीरमधले साडेतीनशे वकील लवकरच ‘नोटरी’ होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.