मुंबई  : प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात सहभागी  होऊ न शकलेला महाराष्ट्राचा “स्वराज्याचे सरखेल दर्यासारंग-कान्होजी आंग्रे”  या विषयावरील  चित्ररथ आता प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी 2020 रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथील संचलनात सहभागी होणार आहे.

ज्यांचे अश्वदल त्यांची पृथ्वी अन् ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रथम आरमार उभारले. स्वराज्याच्या सीमा समुद्रापर्यंत पोहोचवल्या आणि नौसेनेचे महत्त्व अधोरेखित केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदाच समुद्र सैनिकांची तुकडी निर्माण केली. गुराब, गलबते, तरांडे, तारु, शिबाड, मचवा, पगार, वाघोर अशा विविध समुद्र वाहनांची निर्मिती केली.   छत्रपती संभाजी राजे यांनीही सिद्दी, डच, पोर्तुगीज यांना शह देण्यासाठी आरमाराचा विस्तार केला.  छत्रपतींच्या या आरमार उभारणीत अनेक वीरांनी योगदान दिले त्यापैकी एक म्हणजे “कान्होजी आंग्रे”.

चित्ररथातून स्वराज्याची सेवा करतांना कान्होजींच्या नेतृत्वाखाली सागरामध्ये स्वराज्याचे भगवे तोरण कसे दिमाखाने चढले, फडकू लागले, त्यांनी इंग्रज, डच आणि फ्रेंच यांच्यावर समुद्रावरून कसे नियंत्रण ठेवले, याची शौर्यगाथा उलगडून सांगितली जाईल.

सुरतेपासून कोचीनपर्यंत पसरलेल्या अथांग दर्याचा सेनापती, मराठा साम्राज्याचा पहिला नौसेनापती म्हणून  अतिशय धोरणीपणाने आणि मुत्सद्देगिरीने त्यांनी  ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधी सागरी तटावर काम केले.  कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, याठिकाणी  सुधारित जहाज  बांधणी, शस्त्रनिर्मितीची  भरीव कामगिरी केली.

कान्होजींच्या परवानगीशिवाय समुद्रावर कोणीही कोणतीही हालचाल करू शकत नसे. सागरी व्यापाऱ्यांवरही त्यांचे नियंत्रण होते. अनेक सागरी मोहीमा काढून कान्होजींनी इंग्रजांना जेरीस आणले. “लाटेवर स्वार होऊन, तुफानाचा वारा पिऊन, घडले हे आरमार शिवबाचे, हातावर शिर घेऊन, स्वराज्याचे लेणं लेऊन, लढले हे सरदार दर्याचे” असं ज्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन केले जाते त्या कान्होजी आंग्रे यांच्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा करणाऱ्या या चित्ररथाची बांधणी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केली आहे.

जहाजावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात आला असून  कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची माहिती देणारा जिवंत देखावा यानिमित्ताने सादर करण्यात येणार आहे. संचलनात ६० कलावंत सहभागी होत असून मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांना लाठ्या-काठ्या, तलवार बाजी याचेही  दर्शन होईल.