पुणे : किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोठया प्रमाणावर नागरिक दर्शनासाठी येतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने एकत्रितपणे काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवनेरी येथील कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी राम बोलत होते. बैठकीला आमदार अतुल बेनके, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी जितेंद्र डूडी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ सुशोभिकरण, गडावरील साफ-सफाई तसेच गडावरील आकर्षक विद्युत रोषणाई करण्याबाबतचे नियोजन, रस्त्यांची दुरूस्ती, हेलिपॅड व्यवस्था, स्टेज व्यवस्था गडावरील परिसर व कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था, वाहन पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट, वाहतूकीसाठी बसेस, रूग्णवाहिका याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
आ. अतुल बेनके यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आनंदात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा अशी सूचना केली. बैठकीला विविध विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.