मुंबई : नाशिक महापालिकने शहराच्या परिवहन सेवेचा निर्णय सखोल अभ्यास करुन घ्यावा, असे निर्देश  अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. नाशिक महानगरपालिका परिवहन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत श्री.भुजबळ बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व अधिकारी उपस्थित होते.

श्री.भुजबळ म्हणाले, शहराचा विकास झालाच पाहिजे महापालिकेने परिवहन सेवेचा निर्णय घेताना अभ्यास करुन व सर्व बाबींचा सखोल विचार करावा.  मूलभूत सुविधेसाठी  साधारण 80 कोटी रुपये खर्च येणार आहे तसेच वार्षिक 55 कोटी रुपयांचा तोटा होणार आहे. ही वस्तुस्थिती महापालिकेच्या सर्व पदाधिकऱ्यांना निदर्शनास आणावी. यासाठी शासनाकडून अनुदानाची तरतूद नाही.

श्री. शिंदे म्हणाले, नाशिक शहराच्या बससेवेसाठी आवश्यक ते उत्पन्न मिळविण्यासाठी इतर महापालिकांच्या बससेवांचा अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावेत. बससेवेसंबंधी लवकरच पुन्हा एकदा सविस्तर आढावा बैठक घेण्यात येईल. यावेळी नाशिक महापालिका आयुक्त  राधाकृष्ण गमे यांनी नाशिक शहर बससेवेसंबधी सादरीकरण केले.