मुंबई : पॅकींगसाठी प्लास्टिकचा वापर करावा लागणाऱ्या विविध उत्पादनांच्या कंपन्यांसमवेत आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली. बिस्लरी, प्रॉक्टर अँड गॅम्बल, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिवर, हल्दीराम, कोका कोला, कॅडबरी, पेप्सी, पारले आदी विविध कंपन्यांचे तसेच ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, ग्रेटर मुंबई पेट बॉटल पॅकेजींग असोसिएशन आदींचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. वापर झालेल्या प्लास्टिकचे व्यवस्थापन करणे, वापरलेले प्लास्टिक ग्राहकांकडून परत मिळविणे, त्याची रिसायकलींग करणे आदी विविध अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने विविध कंपन्यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

सायन येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीस पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, शासनाने प्लास्टिक कॅरिबॅगसह विविध प्रकारच्या सिंगल युज प्लास्टिकवर पूर्ण बंदी घातली आहे. त्यामुळे प्लास्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होत आहे. पण विविध प्रकारची पेये, पाण्याच्या बाटल्या आदी उत्पादनांच्या पॅकेजींगमध्ये प्लास्टिकच्या वापरास संमती आहे. ग्राहकांकडून या उत्पादनांचा वापर झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा प्रश्न आता आपल्यासमोर आहे. या प्लास्टिकच्या कचऱ्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित कंपन्या आणि शासन मिळून एकत्रीतरित्या काय करु शकतो यावर उपाययोजना सूचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. पाण्याच्या मोकळ्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टीकचे मोकळे रॅपर्स, प्लास्टिक पाऊच, वेष्टणे आदी कचरा परत दिल्यास ग्राहकांना प्रोत्साहन देणे, या प्लस्टिकचा पुनर्वापर करणे आदींबाबत कार्यवाही गरजेची आहे, असे त्यांनी सांगितले.

कंपन्यांनी सुचवलेल्या उपाययोजनांसह फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कंपनी प्रतिनिधींची पुन्हा बैठक घेऊन प्लास्टिक व्यवस्थापनासंदर्भात ठोस उपाययोजना ठरविण्यात येतील. तसेच प्लास्टिकच्या संपूर्ण व्यवस्थापनाच्या दृष्टीने लवकरच संबंधित नगरविकास, ग्रामविकास, उद्योग, पर्यावरण, शिक्षण आदी विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की, पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. यासाठी शासन व्यापक उपाययोजना करीत आहे. पर्यावरण विभागाने याकामी मोठा पुढाकार घेतला आहे. आता विविध कॉर्पोरेट कंपन्या, उद्योग यांनीही या कामी योगदान द्यावे. आपल्या उत्पादनांचे प्लास्टिक पॅकींग, वेष्टणे ग्राहकांकडून परत घेऊन त्यावर प्रक्रिया करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले.

बिस्लरीचे प्रतिनिधी श्री. संतोष यांनी त्यांच्या कंपनीमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘बॉटल फॉर चेंज’ या मोहीमेची तसेच एनएसएस आणि रेल्वेच्या सहभागातून राबविण्यात येत असलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापन मोहीमेची माहिती दिली. प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी विविध कंपन्या एकत्र येऊन कॉमन प्लँट उभा करु शकतात, असे पॅकेजींग असोसिएशन फॉर क्लिन एनव्हायरमेंटच्या प्रतिनिधींनी सांगितले.