नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला काल १४१ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यात सात पद्मविभूषण, पद्मभूषण १६ आणि ११८ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यात ३४ महिला, १८ परदेशी व्यक्ती, तर १२ मरणोत्तर पुरस्कार सामिल आहेत. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि पेजावर मठाचे स्वामी विश्वेशतिर्थ या चौघांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाला आहे.

मॉरिशसचे माजी प्रधानमंत्री अनिरुद्ध जगन्नाथ, मुष्टीयोद्धा मेरी कोम आणि शास्त्रीय गायक छन्नूलाल मिश्रा यांनाही पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. शास्त्रीय गायक अजय चक्रवर्ती, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, माजी राज्यपाल एस सी. जमीर, उद्योगपती आनंद महिंद्र यांना तसंच मनोहर पर्रिकर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

पद्मश्री जाहीर झालेल्या ११८ पुरस्कारप्राप्त व्यक्तीमधे राज्यातल्या क्रिकेटपटू झहीर खान, हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, डॉक्टर रमण गंगाखेडकर, चित्रपट निर्माते दिग्दर्शक करण जोहर तसंच एकता कपूर, अभिनेत्री सरिता जोशी, कंगना राणावत, गायक सुरेश वाडकर, अदनान सामी, सामाजिक कार्यकर्ते सय्यद भाई, वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर सँड्रा डेसा सूजा, महाराष्ट्रातल्या ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांचा समावेश आहे.