नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेलबर्न इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत आपापल्या साथीदारांसह, भारताच्या रोहन बोपण्णानं उपांत्यपूर्व फेरीत, तर लिएंडर पेसनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

आपली साथीदार युक्रेनची नादिया किचेनोक सह रोहननं आज दुसऱ्या फेरीत, ब्राझीलचा ब्रूनो सोअर्स आणि अमेरिकेची निकोल मेलीचर या जोडीचा ६-४, ७-६ असा दोन सेट्समध्ये पराभव केला.

लिएंडर पेस आणि त्याची साथीदार, लॅटव्हियाची येलेना ओस्टापेन्को या जोडीनं, आज पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना, मार्क पोलमन्स आणि स्टॉर्म सॅन्डर्स या ऑस्ट्रेलियाच्या जोडीला ६-७, ६-३, १०-६ असं हरवलं.