श्री. महेश आनंदा लोंढे (संपादक)
आर्थिक डबघाईमुळे संकटात सापडून बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांवर सक्रांत येऊन, हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. परिणामी हजारो कर्मचारी बेकार होऊन त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला; परंतु आता जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक, आनंददायक आणि तितकीच महत्त्वाची बातमी आहे. याला कारणही असेच आहे. कारण जेटची एअरवेजची प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाईस जेट कंपनीने जेटच्या एअरवेजच्या एक दोन नव्हे तर, तब्बल दोन हजार कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत सामावून घेणार असल्याची घोषणा स्पाईसजेट कंपनीचे चेअरमन अजय सिंह यांनी केली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे सध्या जेट एअरवेज कंपनी बंद पडली आहे. यामुळे स्पाईसजेट कंपनीने हा निर्णय जेटच्या कर्मचाऱ्यांना आधार देण्यासाठी घेतला आहे. यामुळे जेटच्या कर्मचाऱ्यांचा संसार पुन्हा उभारण्यास मदत होणार आहे.
जेट एअरवेज बंद पडल्यामुळे तब्बल २२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. आर्थिक संकटात अडकलेल्या जेट एअरवेज कंपनीला अनेक राष्ट्रीय बँकांनी कर्ज देण्यास सुद्धा नकार दिला आहे. त्यामुळे जेट कंपनी आता पूर्णपणे बंद पडली आहे. कर्मचाऱ्यांचे जानेवारी २०१९ पासून पगार मिळालेले नाहीत. जेट कंपनी बंद पडण्यास कंपनीचे संस्थापक नरेश गोयल आणि व्यवस्थापन जबाबदार आहेत, असे अनेकांचे म्हणणे आहे. जेट एअरवेजचे २४ टक्के समभाग एतिहाद एअरवेज या कंपनीकडे आहेत. एतिहादने जेट एअरवेजचे नियंत्रण स्वत:कडे घेऊन कंपनीला आर्थिक साहाय्य करण्याची तयारी दर्शवली होती. पण नरेश गोयल यांनी कंपनीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्यास नकार दिला. ही कंपनी विकत घेण्याची तयारी एकेकाळी टाटा समूहाने दाखवली होती, पण तेव्हाही गोयल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. एतिहादला आपल्याजवळचे २४ टक्के शेअर्स पूर्णपणे विकायचे होते आणि जेटमधून सुटका करून घ्यायची होती, अशी सूत्रांची माहिती आहे.
२००० सालामध्ये जेट एअरवेज ही हवाई उड्डान क्षेत्रातली देशातली सर्वात मोठी कंपनी होती. पण स्पाईसजेट आणि इंडिगोने स्वस्तात विमान वाहतूक सेवा सुरू केल्यामुळे जेट एअरवेजच्या नफ्यात घसरण होण्यास सुरुवात झाली आणि तिथून जेटच्या आर्थिक डबघाईला सुरुवात झाली असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये. जेट एअरवेजची मुख्य आर्थिक पुरवठादार स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल एव्हिएटर्स गिल्डच्या प्रतिनिधींमध्ये अनेक वेळा बैठकी झाल्या, परंतु त्यातून कोणताच तोडगा निघाला नाही. जानेवारीपासून पगार न झाल्याने जेटमधील पायलट आणि इंजिनीअर्सनी संपावर जाण्याचा निर्णय मार्च-एप्रिलमध्ये घेतला होता आणि त्यावेळी ते संपावरसुद्धा गेले. नॅशनल एव्हिएटर्स गिल्डने कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची विनंती केली होती. परंतु ‘पगार नाही, तर काम नाही’ अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली होती. त्यावेळी जेट एअरवेजने त्यांची सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली होती. युरोप आणि आशियातल्या विमान उड्डाणानांचा यात समावेश होता. दिल्लीतून सिंगापूर, लंडन, अॅमस्टरडॅम आणि काठमांडूला जाणारी उड्डाणे रद्द केल्याचे जेटच्या वेबसाईटवरून सांगण्यात आले होते. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टमिर्नल बाहेर निदर्शने केली होती. दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली चाललेली कंपनी आर्थिक भरपाई कशी करणार, आमचे पगार कसे देणार असे प्रश्न या कर्मचाऱ्यांनी त्यावेळी उपस्थित केले होते. यानंतरसुद्धा कर्मचाऱ्यांनी अनेक बैठका व्यवस्थापनाबरोबर केल्या, राजकीय नेत्यासोबत बैठका झाल्या, केंद्रीय मंत्रालयाला कंपनीच्या परिस्थितीबद्दल कळविले, परंतु कोणत्याच हालाचाली झाल्या नाहीत. अनेक बैठकांनंतर सुद्धा तोडगा निघालाच नाही, परिणामी कंपनीला टाळे ठोकावे लागले.
आयसीआरए ही स्वतंत्र क्रेडिट रेटिंग संस्था आहे. जेट एअरवेजच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयसीआरएने त्यांचा देशांतर्गत विमान वाहतुकीसंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली होती.
विमानाची उड्डाणे सतत रद्द होऊ लागल्याने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत विमान भाड़यामध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आयसीआरएने म्हटले आहे. आर्थिक संकटामुळे डबघाईत गेलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसाठी स्पाइसजेट आता तारणहार ठरणार आहे. जेट एअरवेजच्या ११०० कर्मचाऱ्यांना स्पाईसने आपल्या कंपनीत समावून घेतले आहे. यात जेटचे १०० वैमानिक, २०० केबिन क्रू कर्मचारी आणि २०० तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे तूर्तास तरी या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात आम्ही जेटच्या आणखी काही कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेऊ, असे आश्वासनही स्पाईस जेटने दिले आहे. जेट एअरवेजच्या २२ विमानांनाही स्पाईसजेटने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. सध्या स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांची संख्या १४ हजार आहे आणि त्यांच्या ताफ्यात १०० विमाने आहेत.