नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुस-या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमधे आपल्या सरकारनं घेतलेल्या रालोआ सरकारनं गेल्या आठ महिन्यात घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्लीत काल एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या ‘इंडिया ‍अॅक्शन प्लॅन-2020’ शिखर परिषदेला ते संबोधित करत होते.

आता देश वेळ न दवडता आत्मविशवासासह पुढं मार्गक्रमण करेल, असं ते म्हणाले. त्रिवार तलाकची प्रथा बंद करणं, कलम 370 रद्द करणं, छोट्या व्यापा-यांना निवृत्ती योजनेच्या कक्षेत आणणं आणि बोडो शांतता करारावर स्वाक्ष-या हे यापैकी काही महत्वपूर्ण निर्णय असल्याचं ते म्हणाले.

भारतानं पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट निश्चित केलं असून ते साध्य करण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत, असं ते म्हणाले. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल, असं त्यांनी सांगितलं.

प्राप्तीकराबाबत बोलताना प्रधानमंत्री म्हणाले की, करव्यवस्थेत बदल करण्यासाठी सर्व सरकार बिचकतात मात्र, आत्ताच्या विद्यमान सरकारनं करप्रणाली नागरिक केंद्री बनवल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात माध्यमांनी पार पाडलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.

मात्र माध्यमांकडून आपल्या सरकारवर केल्या जाणा-या कुठल्याही टीकेचं स्वागत आहे, मात्र माध्यमांनीही सरकारच्या कल्याणकारी योजना आणि कार्यक्रमांबाबत जनजागृती करावी, असं आवाहन त्यांनी केलं. समृद्ध भारताच्या निर्मितीमधे माध्यमांनी रचनात्मक भूमिका पार पाडावी, असं ते म्हणाले.