मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलेबाजी पाहायला मिळाली.

भाजपने आता आमचा तिसरा विरोधी पक्षनेताही पळवून नेऊ नये, अशी मिष्किल टिप्पणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. आधी एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले, त्यांना भाजपने सत्तेत घेतले. यानंतर विखे-पाटलांनाही तुम्ही तिकडे ओढून घेतले.

आता तिसरे झाल्यानंतर त्यांना मात्र तिकडे घेऊ नका. निदान निवडणुका होईपर्यंत तरी त्यांना इकडे राहू द्या, अशी कोपरखळी अजित पवार यांनी लगावली. यावेळी अजित पवार यांनी रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार नियुक्ती करावी, अशी मागणीही अध्यक्षांकडे केली. यासंदर्भात आम्ही पत्र दिले असून त्याविषयी लवकरात लवकर निर्णय घेतला जावा. विरोधी पक्षनेतेपद हा आमचा हक्क आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.