नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीतल्या दंगलग्रस्त भागाला आज देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट दिली. त्यांनी मौजपूर भागातल्या सुरक्षा परिस्थितीचाही आढावा घेतला. पोलीस आपलं काम चोख करत असून परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, असं ते म्हणाले. ईशान्य दिल्लीतला तणाव निवळत असून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याची माहिती दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईक यांनी दिली आहे.
ते आज वार्ताहरांशी बोलत होते. दंगलग्रस्त भागात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील रस्त्यावर उतरले असून लोकांच्या मनातली भीती कमी करण्यासाठी सुरक्षा दलांनी बाबरपूर, जोहरीपूर आणि मौजपूर भागात आज ध्वजसंचलन केलं. या हिंसाचारात बळी गेलेल्यांची संख्या आता 18 झाली आहे.