पुणे : पोलीस यंत्रणा ही नियमनासाठी असून त्यांच्याशी निष्कारण वाद घालू नये. आपल्या सुरक्षेसाठी कृपया, घराबाहेर पडू नये. भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा नियमित होईल, याची प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले.
पुणे विभागातील कोरोनाबाबत अधिक माहिती देतांना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागामध्ये कोरोना सांर्सगिक रुग्णसंख्येमध्ये ५ ने वाढ झाली असून आज दि.२९/०३/२०२० अखेर एकूण रुग्णसंख्या ६४ आहे. (पुणे-२४, पिंपरी चिंचवड-१२, सातारा-२, सांगली-२५ आणि कोल्हापूर-१) पाठविलेले एकूण नमुने १२८३ होते. त्यापैकी ११९१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून ९२चे अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी १११७ नमुने निगेटीव्ह आहेत व ६४ नमुने पॉझिटीव्ह आहेत. तसेच १० नमुने निष्कर्ष न काढण्यायोग्य आहेत. आतापर्यंत १५ रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून सोडण्यात आलेले आहे. विभागामधील ७१२५ प्रवाशापैकी ४५८१ प्रवाशांबाबत फॉलोअप सुरू असून २५४४ प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे, म्हणजेच २५४४ व्यक्तींचा होम क्वारंटाइन कालावधी पूर्ण झालेला असून ४५८१ व्यक्ती अजूनही क्वारंटाइनमध्ये आहेत.
पुणे शहरामध्ये १३ हजार ५१६ भाजीपाल्याच्या दुकानांमधून व ६४ शेतकरी बाजार संयोजकांकडून भाजीपाल्याचे वितरण असून सोलापूर व इतर जिल्ह्यांमध्ये शहरांमधील मैदानांवर व इतर मोकळ्या जागी नियमांचे पालन करून विक्री करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक वितरण सेवांच्या गोदामामध्ये २८ हजार २१६ मे.टन इतका तर खुल्या बाजारामध्ये १ लक्ष ५५ हजार ५७० मे.टन इतका धान्यसाठा आहे. पुणे शहरामध्ये १८ हजार ४७९ किराणा दुकानांमधून धान्यवितरण करण्यात येत आहे. अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याने नागरिकांनी कोणतीही काळजी करु नये, असेही ते म्हणाले.
पुणे विभागामध्ये दि. २८ मार्च २०२० ला एकूण संकलन ८०.०१ लक्ष लिटर दुधाचे संकलन व २३.३५ लक्ष लिटरचे पॅकेजिंग झालेले आहे. दूध, भाजीपाला, औषधी याबाबत प्रशासनाच्यावतीने आवश्यक ते नियोजन केल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे महानगरपरिवहन महामंडळ लि.(पीएमपीएमएल)च्या दिनांक 28/03/2020 रोजी एकूण 21603 फे-यांपैकी 20015 फेऱ्या रद्द केल्या होत्या. 1588 फेऱ्यांंमध्ये एकूण 6 हजार 666 प्रवाशांनी प्रवास केलेला आहे. सद्यस्थितीमध्ये फक्त अत्यावश्यक बाबींसाठी फेऱ्या सुरु ठेवलेल्या आहेत.
परराज्यातील किंवा पर जिल्ह्यातील कामगार, मजूर यांनी आहे त्या ठिकाणीच थांबावे, असे आवाहन करुन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, या कामगारांच्या निवासाची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात येत आहे, आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचारांचीही सोय करण्यात येईल, त्यामुळे या नागरिकांनी आपल्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्याचा प्रयत्न करु नये. नागरीकांनी अफवांना बळी पडू नये, तसेच शासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले.