शिवटेकडी परिवारातर्फे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा हृद्य सत्कार

अमरावती : केवळ कृषी उत्पादन नव्हे, तर त्याबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्नरत असल्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले.

शिवटेकडी मित्र परिवारातर्फे कृषी मंत्री डॉ. बोंडे यांचा हृद्य सत्कार शिवटेकडी येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी कृषीमंत्र्यांनी शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. श्रीमती वसुधाताई बोंडे, माजी मंत्री यशवंतराव शेरेकर, माजी खासदार अनंतराव गुढे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, दिनेश बूब, जगदीश नाना बोंडे, दिलीप करूले, उद्योजक संजय जाधव, नितीन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. बोंडे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती संवेदनशीलता बाळगून कामे झाली पाहिजेत. हे लक्षात घेऊन अनेक नवे निर्णय घेण्यात येत आहेत. शेती क्षेत्रात परिवर्तनासाठी २० कलमी कार्यक्रम, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीच्या विविध योजना व उपक्रम कृषी खात्याकडून राबविण्यात येत आहे. ग्रामपातळीवरील महत्वाचा घटक असलेल्या कृषी सहायकाच्या उपस्थिती ट्रॅकिंगची अंमलबजावणी तालुका कृषी अधिकाऱ्याकडून करण्याचे निर्देश दिले आहेत.

डॉ. बोंडे यांना कृषी क्षेत्राबद्दल पूर्वीपासून आस्था व जाण आहे. त्यामुळे ते कृषी मंत्री पदाला निश्चित न्याय देतील, असे श्री. गुढे यांनी सांगितले. विद्यार्थी दशेपासून डॉ. बोंडे हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिव्हाळा, उत्तम कार्यपद्धती व कुशल नेतृत्व आदी गुण त्यांच्या ठायी आहेत, असे श्री. जाधव म्हणाले.

श्री. शेरेकर, श्री. बूब, श्री. जयपूरकर यांच्यासह अनेकांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे राजेश पिदडी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कृषी मंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. शिवटेकडी संवर्धन समितीचे सदस्य व अनेक मान्यवर नागरिक यावेळी उपस्थित होते.