नवी दिल्‍ली : मालदीवमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आणि सुरळीत व सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या समुद्र सेतु अभियानांर्गत दुसरे नाविक जहाज ‘आयएनएस मगर’ 10 मे 20 रोजी सकाळी ‘माले’ बंदरात दाखल झाले. आयएनएस मगर, हे किनाऱ्यावर किंवा जमिनीवर थांबा घेण्यासाठी विकसित केलेले असून नागरिकांचा प्रवास सुखकारक व्हावा म्हणून, मालदीवच्या दिशेने प्रवास करण्यापूर्वी कोची बंदरात त्यात आवश्यक ती वाहतूकविषयक ,वैद्यकीय आणि प्रशासकीय तयारी करण्यात आली होती.

सुरक्षित शारीरिक अंतर नियमांसह कोविड-19 शी संबंधित सर्व उपाययोजनांचे पालन करीत हे जहाज सुमारे 200 नागरिकांची सुटका करेल. अन्न आणि स्वच्छतागृहांसारख्या अत्यावश्यक सुविधांसह जहाजाचा संपूर्ण वेगळा विभाग सुटका केलेल्या नागरिकांना सामावून घेण्यासाठी तयार करण्यात आला आहे.  महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र खानावळीची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवणाचे हॉल, स्वच्छतागृह इत्यादीसारख्या सामाईक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून या लोकांना वेगवेगळ्या गटात विभागून अतिरिक्त खबरदारी घेतली गेली आहे.

दरम्यान मालदीवहून रवाना होणारे पहिले जहाज ‘आय.एन.एस. जलाश्व’ आज सकाळी जवळपास 698 भारतीय नागरिकांसह कोची बंदरात पोहोचले.