नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात पाच वर्षांत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. या वार्तालापात मोदींनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, पण भाजपप्रणीत एनडीए आघाडीचे सरकार पुन्हा केंद्रात स्थापन होईल, असा दावा केला.
केंद्रात पाच वर्षे पूर्ण बहुमत असलेले सरकार चालवले जाते, तेच सरकार पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सत्तेत येते असे दीर्घकाळ पाहायला मिळालेले नाही. सत्तेवर आलेल्या काही सरकारांना पुन्हा सत्ता मिळाली नाही. काही सरकारे वर्ष-दीड वर्षे टिकली. काही सरकारांना पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी जरूर मिळाली, पण घराण्याच्या आशीर्वादाने ती सत्तेत राहिली, असे सांगत मोदींनी गांधी कुटुंबावर अप्रत्यक्ष टीका केली.
२०१९ ची लोकसभा निवडणूक ‘शानदार’ झाली. पूर्ण बहुमतातील सरकारला लोकांनी पाठिंबा दिला. मतदारांना धन्यवाद देण्यासाठी मी प्रचारात उतरलो होतो. यंदाचा प्रचार म्हणजे माझ्यासाठी ‘धन्यवाद मोहीम’ होती, असे मोदी म्हणाले. भाजपच्या संकल्पपत्रात विकासकामांचा उल्लेख केलेला आहे. त्यातील प्रत्येक काम देशातील अखेरच्या लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचे भाजपचे लक्ष्य असेल. निकालानंतर सत्ता स्थापन होताच विकास कामे पुन्हा सलग सुरू होतील, असेही मोदी यांनी सांगितले.
पाच वर्षांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमुळे आयपीएलचे सामने देशाबाहेर घ्यावे लागले होते पण, यावेळी देशात आयपीएलचे सामने खेळले गेले, रमझान, परीक्षा झाली आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचारही झाला. सर्व गोष्टी शांततेत पार पडल्या. हे केंद्रात सशक्त सरकार असल्यामुळेच साध्य होऊ शकले, असेही मत मोदींनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 3 =