मुंबई : ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने भारतीय इतिहासाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आयुष्य वेचलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. गोरक्षकर हे इतिहास,कला, पुरातत्त्व आणि वस्तूंच्या जतनाशी संबंधित शास्त्राचे एक महत्त्वाचे अभ्यासक होते. या विषयांवरचा व्यासंग जोपासतानाच ऐतिहासिक वस्तूंच्या जतनासाठी त्यांनी कृतीशील प्रयत्न केले.

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे संचालकपद त्यांनी दीर्घकाळ समर्थपणे आणि जाणिवेने सांभाळले. वस्तुसंग्रहालयाशी संबंधित विषयांतील त्यांचा अधिकार फार मोठा होता. याशिवाय आपल्या लिखाणाच्या माध्यमातून देशाच्या समृद्ध इतिहासाची ओळख इथल्या वर्तमान पिढीला करुन देण्यासाठी त्यांनी निष्ठेने प्रयत्न केले.