पुणे : मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी महा मेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो मुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसनाचे काम लवकर सुरु करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले.

मेट्रो बाधित झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसनाबाबत आज डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.
बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, महा मेट्रोचे अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल मोहळकर, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे, झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, महा मेट्रो मार्ग १ आणि २ तसेच पीएमआरडीए मेट्रो मार्ग ३ मध्ये बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे एकत्रित पुर्नवसन करण्याच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. या विषयी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बाधित झोपडपट्टीधारकांच्या प्रतिनिधींसोबत येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन त्यानंतर पुढील कार्यवाही करावी, असेही डॉ. म्हैसेकर यांनी बैठकीत सांगितले.
महामेट्रो, पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पुर्नवसनाबाबतची कार्यवाही समन्वय ठेवून पूर्ण करावी, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले.

मेट्रो मार्गातील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाबाबत तसेच पुनर्वसन करता येणाऱ्या जागांबाबत जिल्हाधिकारी श्री. राम यांनी माहिती दिली.

बैठकीला संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.