मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत आता कोणत्याही गृहनिर्माण संस्थेत अथवा इमारतीत १० पेक्षा जास्त कोविड-१९ चे रुग्ण आढळल्यास ती पूर्ण इमारत सील केली जाईल, असं महानगरपालिकेनं म्हटलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काल एका बैठकीत ही माहिती दिली. कोविडचा पुढील प्रसार रोखण्यासाठी कोणतीही इमारत पूर्णपणे सील करण्याचा निर्णय संबंधित पालिका उपायुक्त किंवा वैद्यकीय अधिका-यांनं घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
दरम्यान गेल्या २४ तासांत मुंबईत १ हजार ५८६ नवीन कोविड-१९ चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ७३ हजार ५९६ झाली आहे. कालच्या दिवसात ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत कोविड-१९ मुळे आठ हजार २३० रुग्ण दगावले आहेत. संपूर्ण मुंबईत कोविड-१९ मुळे आठ हजार ७६३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.