नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनची आक्रमक वागणूक केवळ संवाद आणि करार करून बदलू शकणार नाही, हे स्वीकारण्याची वेळ आता आली आहे असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटलं आहे. चीनने आपल्या विस्तारवादी धोरणातून भारताच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भाग जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असल्याचंही ते म्हणाले.

चीन सरकारने भारताच्या नियंत्रण रेषेजवळ 60 हजार सैन्य तैनात केलं असल्याचा खुलासा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओने यांनी केला आहे. क्वाड अर्थात भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका, चार मोठ्या लोकशाही आणि सामर्थ्यशाली अर्थव्यवस्था असलेल्या देशांना धमकावल्या बद्दल पोम्पीओ यांनी चीनवर जोरदार हल्ला केला.

मंगळवारी क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची टोकियो इथं भेट झाली. इंडो-पॅसिफिक, दक्षिण चीन समुद्र आणि पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या बाजूने चीनच्या आक्रमक लष्करी हालचालीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली.