महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फॉरवर्ड महाराष्ट्र – अ फ्युचर ऑफ लर्निंग समिट’चे आयोजन

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मातृभाषेतून मिळावे व महाराष्ट्रातील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ व्हावा, यादृष्टीनेच एमआयईबीची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये एमआयईबी शिक्षण मंडळाला अधिक प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने गुगलच्या सहकार्याने आयोजित केलेला हा आजचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. गुगलचे अत्याधुनिक तंत्रज्ञान शाळांमध्ये वापरण्यात येत आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना होणार असून, त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक दर्जेदार होऊ शकेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (एमआयईबी) आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने फॉरवर्ड महाराष्ट्र – अ फ्युचर ऑफ लर्निंग समिट या विषयावर एकदिवसीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

एमआयईबीची या शिक्षण मंडळाची ओळख सीबीएसई, आयसीएसई, आयबी यांसारख्या विविध शिक्षण मंडळांना व्हावी, तसेच एमआयईबीचे शिक्षक व मुख्याध्यापक आणि अन्य मंडळाचे शिक्षक मुख्याध्यापक यांच्यामध्ये संवाद व्हावा व दोन्ही मंडळांमध्ये शैक्षणिक आदान-प्रदान व्हावे यादृष्टीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना श्री. तावडे म्हणाले, शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने प्रत्येक बोर्ड हे चांगले आहे. प्रत्येक बोर्डाचे स्वतंत्र अस्तित्व आहे. या बोर्डांमध्ये शैक्षणिक अध्ययन पद्धती स्वतंत्र प्रकारची आहे. आज या परिषदेच्या निमित्ताने विविध बोर्डाचे मुख्याध्यापक व शिक्षकांना एकमेकांच्या बोर्डाचा अभ्यासक्रम आणि शैक्षणिक पद्धती जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. शैक्षणिकदृष्ट्या जे चांगले आहे, त्या गोष्टींचा स्वीकार नक्कीच मंडळाला होऊ शकेल, त्याचा लाभ विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता अधिक विकसित होण्याच्या दृष्टीने नक्कीच होईल.

शिक्षक व मुख्याध्यापक हा एमआयईबीचा पाया आहे, एमआयईबीचा हा प्रयोग सशक्तपणे पुढे न्यायचा आहे, त्यादृष्टीने गुगल च्या सहकार्याने अशा स्वरुपाचा आधुनिक उपक्रम सुरु केला आहे. आगामी काळात एमआयईबी च्या वतीने अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येतील आणि या प्रकारच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एमआयईबी शिक्षण मंडळाची नवीन ओळख निर्माण होईल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

यावेळी गुगल फॉर एज्युकेशनच्या एपीएसीचे हेड कॉलिन मार्सन उपस्थित होते. मार्सन यांनीही महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेमधील गुगलच्या सहभागाबद्दलचे आपले विचार मांडले.