नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांग्लादेश जलस्रोतांच्या एकंदर समस्या सोडवण्यासाठी सहकार्य वाढविण्यावर सहमती व्यक्त केली आहे. यामध्ये नद्यांचं पाणी वाटप, प्रदूषण कमी करणं, नद्यांच्या किनाऱ्यांचं संरक्षण, पूर व्यवस्थापन आणि खोऱ्यांचं व्यवस्थापन यासह विविध मुद्यांचा समावेश आहे. जल शक्ति मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं की दोन्ही देशांचा एक संयुक्त तांत्रिक कार्यकारी गट या बाबतीत सूचना करेल.

संयुक्त नदी आयोगाच्या चौकटीनुसार भारत-बांग्लादेश जलस्रोत सचिव स्तरावरची बैठक काल नवी दिल्लीत घेण्यात आली. यामध्ये भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व जलस्रोत विभागाच्या सचिवांनी केलं. तर बांग्लादेशच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व त्या देशाच्या जलस्रोत मंत्रालयाचे वरिष्ठ सचिव, कबीर बिन अन्वर यांनी केलं. भारत आणि बांग्लादेश दरम्यान 54 सामायिक नद्या असून दोन्ही देशांमधील लोकांच्या उपजीविकेवर त्याचा थेट परिणाम होतो. याबाबतीत दोन्ही देशांमधील आजवरच्या सहकार्याची प्रशंसा या बैठकीत करण्यात आली. यानंतर संयुक्त सचिव पातळीवरील बैठक ढाका इथं घेण्याचंही ठरविण्यात आलं.