नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाही आणि स्वातंत्र्य या मूल्ये अबाधित राखण्यासाठी भारत आणि अमेरिका वचनबद्धतेने काम करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अॅटनी ब्लिंकन यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. कोरोनानं निर्माण केलेल्या जागतिक संकटातून मार्ग काढण्याच्यादृष्टीनं भारत आणि अमेरिका या दोन मोठ्या लोकशाहीवादी देशांमधली धोरणात्मक भागिदारी जागतिक पटलावर महत्वाची ठरणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. अमेरिकेतल्या अनिवासी भारतीयांनी दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होण्याच्यादृष्टीनं महत्वाचं योगदान दिलं असल्याचं ते म्हणाले.संरक्षण, सागरी सुरक्षा, व्यापार आणी गुंतवणूक, हवामानबदल, तसंच तंत्रज्ञानासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतासोबतचे धोरणात्मक संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी अमेरिका वचनबद्ध असल्याचं ब्लिंकन यांनी या भेटीत सांगितलं. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताच्या लसीकरण मोहिमेला अधिक बळ देण्यासाठी अमेरिकेनं भारताला अडीच कोटी डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. लसीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवाचं रक्षण करण्यात अमेरिकची ही मदत कामी येईल असं ब्लींकन यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.