मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्गाचे नियम आपण पाळले नाहीत तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्याला आपली वनं आणि वन्यजीव वैभव जपायचं आहे. त्यासाठी जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र गाठीशी बांधत पुढं जाऊया, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केलं. मुंबईत वन्यजीव सप्ताहाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्येही झाली पाहिजे असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भात रुची निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. वन संरक्षकांना आगामी काळात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. या सप्ताहाच्या माध्यमातून वनांचं, वन्यप्राण्यांचं अस्तित्व जगासाठी, माणसांसाठी किती महत्वाचं आहे, हे समजवण्यात आपल्याला यश मिळेल, वन्यप्राणी संरक्षणाच्या चळवळीला बळ मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होत व्यक्त केला. राज्याच्या नागरी भागात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री म्हणजेच वारसा वृक्ष’ असं संबोधून त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या संरक्षणासाठीचा कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे असं पवार यांनी सांगितलं.