मुंबई : राज्यातील नव्याने पुढे आलेल्या सहकारी संस्थांनी अटल महापणन विकास अभियान व अटल अर्थसहाय्य योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना केले.
येथील षण्मुखानंद सभागृहात आज अटल अर्थसहाय्य योजनेची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त सतीश सोनी, सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांच्यासह राज्याच्या विविध भागातील सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पूर्वी सहकाराची कोणतीही योजना आली की त्याचा लाभ ठराविक संस्थांनाच मिळत असे. सहकारी संस्था ह्या प्रायव्हेट लिमिटेड संस्थांसारख्या चालवल्या जात असत. सहकाराचे खासगीकरण झाल्यासारखी अवस्था होती. पण आता हे रोखले गेले आहे. सहकारातून फक्त विशिष्टांचा विकास होणे योग्य नसून सहकाराचा लाभ सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे. अटल अर्थसहाय्य योजनेतून लाभ घेतलेल्या संस्थांनी हेच ध्येय समोर ठेवून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. सहकार म्हणजे मालकी नसून आपण विश्वस्त आहोत या भावनेने काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.
सध्या या योजनेसाठी ५०० कोटी रु. दिलेले आहेत. सर्वांनी मिळून योजना यशस्वी करावी. लोकांना त्याचे लाभ मिळावेत. भविष्यात योजनेसाठी आणखी भरीव निधी उपलब्ध करु, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले,अटल महापणन विकास अभियान व अटल अर्थसहाय्य योजनेतून नवीन सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. नव्याने पुढे आलेल्या सहकारी संस्थांनी त्यांना मिळालेल्या अनुदान तसेच कर्जाचा योग्य विनियोग करावा. गावात रोजगार निर्माण होतील यासाठी प्रयत्न करावेत. गावातील तरुणाला गावातच रोजगार मिळून तो गावातच राहिल यासाठी सहकार क्षेत्राने व्यापक कार्य करणे गरजेचे आहे. नवीन सहकारी संस्थांनी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सहकार विकास महामंडळाच्या संकेतस्थळाचे तसेच विविध माहिती पुस्तकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. काही प्रातिनिधीक सहकारी संस्थांना कर्ज तथा अनुदानाचे मंजुरी आदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.