मुंबई : राष्ट्रीय योजना व कृती आराखड्यासंदर्भातील एकसूत्री यंत्रणेची (युनिफाइड कमांड मेकॅनिझम) बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्त क्षेत्रातील विविध योजनांच्या कामांना गती देण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.
नक्षलग्रस्त गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील रस्ते, पूल, मोबाईल नेटवर्क,शिक्षण, आरोग्य आदी विविध विषयांचा यावेळी आढावा घेण्यात आला. या विषयांसंबंधीच्या कामांना तसेच जिल्हा प्रशासनाच्या कामांना गती देऊन ती कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
नक्षलग्रस्त भागातील पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांना दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यात बदलीचे आदेश त्यांना नियुक्ती आदेशाच्या वेळीच द्यावे. त्यामुळे त्या जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपली बदली होणार याची निश्चिती असल्यामुळे ते कार्यक्षमतेने कामे करतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी यावेळी उपस्थित होते.