नवी दिल्ली : प्लॅस्टिक वापराला आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृतीची गरज केंद्रीय ग्राहक हित, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केली आहे. ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकल वापर प्लॅस्टिकमधून 95 लाख टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो. त्यापैकी 6 लाख टन समुद्रात सोडला जातो.
अन्नपदार्थांच्या वेष्टनात प्लॅस्टिकचा वापर बंद करून 100 टक्के ज्यूटचा वापर करण्याचे मंत्रालयाचे उद्दिष्ट असल्याचे पासवान यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठी एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांना पर्याय शोधण्यासाठी मंत्रालय काम करत आहे. यासंदर्भात उद्योग संघटना, विविध सरकारी विभाग यांच्यासोबत बैठका घेण्यात येत आहेत, असे पासवान यांनी सांगितले.






