21 वे शतक हे भारताचे शतक असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षात प्रत्येक भारतीयाला दिला – अमित शहा

नवी दिल्ली : 21 वे शतक हे भारताचे शतक आहे, हा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षात प्रत्येक भारतीयाला दिले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे अखिल भारतीय व्यवस्थापन संस्थेने आयोजित केलेल्या 46 व्या राष्ट्रीय व्यवस्थापन परिषदेत बोलत होते.

नवभारताबाबतचा पंतप्रधानांचा दृष्टीकोन शहा यांनी विषद केला. पंतप्रधानांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 130 कोटी भारतीयांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोदी सरकारने 2014 पूर्वीचा धोरणलकवा दूर करत एका पाठोपाठ एक धाडसी निर्णय घेऊन देशात परिवर्तन घडवून आणले. आधीच्या सरकारने गेल्या 30 वर्षात केवळ पाच धाडसी निर्णय घेतले. तर मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात 50 हून अधिक निर्णय घेतले, असे शहा यांनी सांगितले. गरीबांच्या कल्याणाचा विचार करणारे सरकारे धाडसी निर्णयही घेऊ शकते, हे मोदी सरकारने दाखवून दिले.

राष्ट्रीय सुरक्षेशी जराही तडजोड केली जाणार नाही, हा विश्वास सरकारने जनतेच्या मनात निर्माण केला.

कलम 370 आणि 35ए रद्द करण्याबरोबरच अखंड भारताचे स्वप्न साकार झाले असून कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये कुठलाही दहशतवादी हल्ला किंवा घटना घडली नसल्याचे शहा यांनी नमूद केले.

भारताने उचललेल्या पावलांमुळे भारताकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोनही बदलला. दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचमध्ये पंतप्रधानांनी हिंदीतून भाषण केले. त्यावरून जग भारताचा किती सन्मान करत असल्याचे कळून येते.

वर्ष 2024 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल सुरू असल्याचे सांगत, शहा यांनी गेल्या पाच वर्षात झालेली देशाची प्रगती उलगडून सांगितली.