पिंपरी : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या देशाचा दबदबा निर्माण केला आहे. ते देशातील गोरगरीब जनतेसाठी अविरतपणे कार्य करीत आहेत. देशातील प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा देशातील प्रत्येकाला अभिमान असल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी (दि. १७) सांगितले.
पिंपरी-चिंचवडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताहच्या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी चिंचवड येथील पुनरूत्थान समरसता गुरूकुलम आश्रमातील विद्यार्थ्यांना आमदार लक्ष्मण जगताप आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपसभापती डॉ. हेमंत तापकीर यांच्या हस्ते अन्नधान्य व फळ वाटप करण्यात आले. त्यावेळी आमदार जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.
यावेळी महिला व बालकल्याण सभापती निर्मला कुटे, नगरसेवक चंद्रकांत नखाते, नगरसेविका आरती चोंधे, नीता पाडाळे, सुनिता तापकीर, सविता खुळे, गुरुकुलमचे गिरीश प्रभुणे, भाजयुमोचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर, शुभम नखाते, संतोष ओझा, विणा सोनवलकर, छत्रभुज झाडे, शशिकांत करुटे, सुभाष बनकर, अजय वाकोडे, अविनाश भंडारे, किशोर जानराव, विनोद भिसे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुकुलम परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता साहित्य देण्यात आले. तसेच राहटणी काळेवाडी परिसरातील नागरिकांना केंद्र व राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. भाजपचे शहर उपाध्यक्ष हरेश तापकीर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राज तापकीर यांनी आभार मानले.