मुंबई (वृत्तसंस्था) : स्कॉटलंड इथल्या कॉप ट्वेंटी सिक्स परिषदेत महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप पुरस्कार मिळाला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. राज्यानं हवामानविषयक भागिदारी आणि हवामानविषयक समस्यांवर केलेल्या अभिनव उपाययोजनांची या परिषदेत विशेष दखल घेतली गेली, या पुरस्कारामुळे राज्याच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळाली, याचं समाधान वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हा पुरस्कार आपण राज्यातली जनता आणि देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयाला समर्पित करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  शाश्वत भविष्यासाठी जगभरातले हवामानविषयक गट स्थानिक शासकीय संस्थांसोबत काम करत आहेत. महाराष्ट्रही त्यांच्यासोबत विविध उपाययोजनांवर काम करेल, असंही ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.